पुणे : ‘काका लोणंद चे एक तिकीट द्या. घरी जायचे आहे.’ डोळे चोळत एका निरागस चेहऱ्याच्या चिमुकलीने कंडक्टरकडे तिकिटाची मागणी केली. एकच तिकीट हवे आहे का ?, आई वडील कुठे आहेत? असा प्रति प्रश्न केला असता, हो मी एकटीच आहे, मला घरी जायचे आहे. यावरून कंडक्टरने तिला बस आगरात घेऊन गेले. ती चुकली असावी असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला. मात्र दोन तरुणांनी तिला बागेत खेळायला जाऊ असे सांगून लोणंद शहर, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथून हडपसर पळवून आणल्याचा प्रकार समोर आला. आपण हरवलो आहोत हे समजत असताना देखील रडत न बसता त्या चिमुकलीने धीट होऊन घराकडे जाण्यासाठी थेट बस गाठली. यामुळे तिचे कौतुक केले जात होते.
वैष्णवी दत्तात्रेय खंडागळे (६ वर्षे.रा.लोणंद शहर,तालुका खंडाळा,जिल्हा सातारा.) असे त्या चिमुकलीचे नाव आहे. बस आगारातील गर्दी बघून सेव्ह द चिल्ड्रनच्या सुप्रिया नलावडे यांनी पाहणी केली असता, त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण प्रधान यांच्या सोबतीने त्यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी तिने घडलेला प्रसंग पुन्हा कथन केला. त्यावेळी ती राञभर बस आगाराच्या जवळ असलेल्या पदपथावर झोपली असल्याचे समजले. सकाळी बस सुरु होताच ‘ती ‘ लोणंदकडे निघाली होती. ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तिने सांगितलेल्या माहितीची शहानिशा केली. लोणंद पोलीस ठाण्याच्या मागेच ती रहात असल्याची माहिती खरी ठरली. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात सापडली असून तिला लोणंद पोलीस ठाण्याकडे हवाली करीत असल्याची नोंद करण्यात आली. असे पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी सांगितले. त्यानंतर तिला एक महिला पोलीस कर्मचारी, नलावडे आणि प्रधान यांचे सहकारी यांनी एका खाजगी गाडीने प्रवास करत लोणंदमध्ये सोडण्यात आले.
दरम्यान, लोणंद पोलिसांनी चौकशी केली असता, तिच्या आईवडिलांना मुलगी हरविले आसल्याचे ही लक्षात नव्हते. मुलीला ताब्यात देण्यासाठी आईवडिलांना बोलाविले असता ते घरी नसल्याने आजी आजोबांना बोलविण्यात आले. खात्री करूनच तिला त्यांच्या सुपूर्त करण्यात आले. असे नलावडे यांनी लोकमतला सांगिलते. लोणंद पोलिसांनी यावर नेमकी कोणती कार्यवाही केली याची माहिती घेण्याचा प्रयन्त केला असता संपर्क होऊ शकला नाही.