प्रतिनिधी :- अजय जाधव
पुणे:- कर्ज फेडण्यासाठी ज्वेलर्समधून १० लाखांचे दागिने चोरणाऱ्या कामगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले. १४ फेब्रुवारीला लक्ष्मी रस्त्यावरील नीलकंठ ज्वेलर्समध्ये चोरी झाली होती. राजेंद्र उर्फ बापू तुकाराम साळुखे (वय ३९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. साहिब दयालसिंग दिलबाग सिंग बीर (वय ३७) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुकान मालक साहिब हे १४ फेब्रुवारीच्या रात्री दागिन्यांचा ताळेबंद करीत होते. त्यावेळी त्यांना ९ लाख ५९ हजारांचे दागिने कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस तपास करीत असताना दुकानातील कामगारांकडे त्यांनी चौकशी केली. चौकशी दरम्यान कामगार राजेंद्र उर्फ बापू साळुखे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने घरात लपवून ठेवलेले दागिने काढून दिले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले उपनिरीक्षक सनील कुलकर्णी, सचिन जाधव, प्रशांत गायकवाड, अजय थारात, महेश बामगुडे, सतीश भालेराव, योगेश जगताप, मीना पिंजण, अय्याज दड्डीकर यांच्या पथकाने केली.