(पिपीसी न्यूज )प्रतिनिधी!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे भोसरी येथे नवीन भोसरी रूग्णालय आहे. त्यासाठी महानगरपालिकेने कोट्यवधी रूपयांचा खर्च केला आहे. रूग्णांवर उपचार करण्यासाठी अनुभवी डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. दररोज शेकडो रूग्णांवर उपचार केले जातात.
रूग्णालयात आठ बेडचे अतिदक्षता विभाग आहे. मात्र, अतिदक्षता विभागात गंभीर व अस्वस्थ रूग्णांना दाखल करून घेतले जात नाही. त्या रूग्णांना खासगी रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे महत्वाचा वेळ वाया जातो. त्यात रूग्ण दगावण्याचा धोका निर्माण होतो. तसेच, रूग्णालयाचा शोध घेण्यासाठी सर्वसामान्य रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते.
अतिदक्षता विभागात महानगरपालिकेने लाख ते दीड लाख रूपये वेतनावर अनुभवी फिजिशियन डॉक्टर नेमले आहेत. महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय व इतर रूग्णालयांत अतिदक्षता विभाग नेहमी फुल्ल असतात. तेथे रूग्ण दाखल करून घेण्यासाठी नेहमी वेटींग असते. मात्र, नवीन भोसरी रूग्णालयात अतिदक्षता विभागात रूग्णांना दाखल करून न घेता, त्यांना खासगी रूग्णालयत किंवा इतर रूग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली जात आहे.
त्यामुळे येथील डॉक्टरांचा बाहेरील खाजगी रुग्णालयाशी आर्थिक हितसंबंध असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा नवीन भोसरी रूग्णालयासमोर आंदोलन केले जाईल, त्याची संपूर्ण जबाबदारी आपणावर असेल, यांची नोंद घ्यावी ही विनंती. असा इशारा भाजपा शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी दिला.





















































