पिपीसी न्यूज नेटवर्क
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) –
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक १८ मध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप समोर आला आहे. भाजपच्या उमेदवार अपर्णा डोके यांच्या पती निलेश डोके यांनी मतदान करतानाचा व्हिडीओ व फोटो थेट सोशल मीडियावर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
निवडणूक आयोगाच्या स्पष्ट निर्देशानुसार मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास मनाई आहे. असे असतानाही निलेश डोके यांनी मतदान केंद्रात मोबाईल नेल्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे मतदान अधिकारी, पोलीस यंत्रणा तसेच बूथ प्रमुखांच्या कामकाजावरही संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मतदानाची प्रक्रिया ही गोपनीय व निर्भय असणे अपेक्षित असताना, उमेदवाराच्या निकटवर्तीयाकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप होत आहे. मतदानाचा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणे हे केवळ आचारसंहितेचे उल्लंघन नसून, निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेवर आघात करणारे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने संबंधित प्रकरणाची दखल घेतली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई होणार का, की प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जाणार, याबाबत शहरात चर्चा सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















































