पिपीसी न्यूज नेटवर्क
सांगवी | प्रतिनिधी
निवडणुकीनंतरच्या वातावरणात अनेक ठिकाणी निराशा पसरलेली असताना, डॉ. शीतल यांनी आपल्या वडिलांसाठी लिहिलेले एक भावनिक पत्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पत्रातून त्यांनी वडिलांच्या संघर्षमय राजकीय प्रवासाला मानवंदना देत, पराभवातही नैतिक विजय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.
“हे पत्र लिहिताना मन भरून आले असून डोळ्यांत अश्रू आहेत,” अशा शब्दांत पत्राची सुरुवात करत डॉ. शीतल यांनी गेल्या अनेक वर्षांतील वडिलांच्या संघर्षाचा आढावा घेतला आहे. सामान्य जनतेसाठी, कष्टकरी वर्गासाठी आणि दुर्बल घटकांसाठी आयुष्याची उमेदीची वर्षे झिजविल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे.
नाकार, संघर्ष, अन्याय आणि अपमान सहन करूनही वडील कधी डगमगले नाहीत, उलट जिद्दीने निवडणुका लढवत राहिले, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सांगवी-नवी सांगवी परिसरात तब्बल २५ वर्षे केलेल्या सेवेचे फळ म्हणून मायबाप जनतेने त्यांना भरभरून पाठिंबा दिला, असेही त्यांनी नमूद केले.

प्रचारादरम्यान जनतेचा वाढता विश्वास, विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेली मोहीम आणि शेवटच्या क्षणी घडलेल्या घटनांमुळे आलेली निराशा, हे सर्व अनुभव त्या पत्रातून स्पष्टपणे व्यक्त होतात. मात्र, “हेवेदावे, कटकारस्थानं आणि आरोप यांपेक्षा जनतेचा विश्वास मोठा आहे,” असा ठाम विश्वास डॉ. शीतल यांनी व्यक्त केला आहे.
“तुम्ही खंबीरपणे उभे आहात. मायबाप जनता कायम तुमच्या पाठीशी आहे. मी, दीदी आणि मम्मी तुमच्या सोबत आहोत,”असे सांगत त्यांनी वडिलांना मानसिक आधार दिला आहे. तसेच, पुढील काळातही जनतेची सेवा सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पत्राच्या शेवटी अत्यंत भावनिक शब्दांत,
“पप्पा, तुम्ही हरलेले नाहीत, तर जिंकलेले आहात!”
असा ठाम संदेश देत त्यांनी संघर्षाला सलाम केला आहे.
हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, अनेक नागरिकांकडून त्यावर भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकारणातील पराभवापेक्षा नात्यांची जिद्द, विश्वास आणि मूल्ये किती महत्त्वाची असतात, याचे हे पत्र जिवंत उदाहरण ठरत आहे.




















































