पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी चिंचवड : हिंजवडी पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रोन) विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई २४ मार्च २०२६ रोजी गुन्हे शोध पथकाने सापळा रचून केली.
पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आदेशानुसार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, पोलीस अंमलदार नरेश बलसाने, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे आणि अरुण पारधी हे पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली. त्यानुसार वाकड परिसरातील विनोद वस्ती येथे सापळा लावण्यात आला.
या कारवाईत अतुल शंकर बालगुडे (वय ३५, रा. पाथरगाव, ता. मावळ, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे ४,२०,००० रुपये किमतीचा ४२ ग्रॅम एम.डी. अमली पदार्थ तसेच एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान त्याचा साथीदार शाहरुख उर्फ सहदम इकबाल अन्सारी (रा. गोवंडी, मुंबई) यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे २०० ग्रॅम एम.डी. अमली पदार्थ (किंमत अंदाजे २०,००,००० रुपये) जप्त करण्यात आले.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४८/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २२(क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ हे करत असून पुढील तपास सुरू आहे.



















































