पुणेः- महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे
हा निर्णय चुकीचा आणि विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळणारा निर्णय असून 3 दिवस राहिले असताना परीक्षा पुढे ढकलणं निषेधार्ह आहे. याचं समर्थन होऊच शकत नाही, तातडीने हा निर्णय बदलला पाहिजे असं महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी म्हटलंय. या आधी 3 वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. 11 ऑक्टोबर 2020 ला नियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती. ती आता 14 मार्चला होणार होती, पण वाढत्या कोविड रुग्णसंख्यंमुळे ती देखील पुढे ढकलण्यात आली आहे.
या निर्णयाचा निषेध करत पुण्यामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांनी विद्यार्थ्यांसोबत पुण्यातल्या शास्त्री रस्त्यावर रास्ता रोको केला.