पुणे :- पुण्यात कोरोनाचे ५ रूग्ण आढळले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एका आदेशाद्वारे केली आहे. दरम्यान, कोरोना संनियंत्रक अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणु संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहे. त्यामुळे कोरोना विषाणुचे संशयित रुग्ण पुणे शहरातही आढळुन आल्याचे निदर्शनात आलेले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुच्या संसर्गात अधिक वाढ होवु न देता तात्काळ उपाय योजना आखणे आवश्यक आहे. सदर संशयित रुग्णांमुळे. आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकरी या नात्याने आपण पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्याचे घोषीत करीत आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर काम यांनी आदेशात म्हटले आहे.