*शिवधर्म फाउंडेशनचे पुणे दुग्ध विकास कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन*
*३४ रुपयाच्या परिपत्रका प्रमाणे दुधाला ३४ रुपये हमी भाव मिळावा, वंचित दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे*
पिपीसी न्युज; प्रतिनिधी अजय जाधव-
दूध व्यवसाय हा पूर्वी जोडधंदा म्हणून पाहिला जात होता, कारण नागरिकांकडे शेती मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे शेतीतील कामे भरपूर प्रमाणात असत व दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून पाहिला जाईल. पण आत्ताच्या काळामध्ये वाढती महागाई आणि जमिनीचे होत जाणारे वाटे पाहता दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे.
दुधाला ३४ रुपये हमीभाव देण्याचे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले परंतु, त्यापेक्षा कमी दर मिळत असल्याने दुग्ध व्यवसायीक सध्या त्रस्त आहेत. याच कारणास्तव दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी दुग्धविकास कार्यालय, पुणे येथे शिवधर्म फाउंडेशन तर्फे पुणे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ५०० शेतकऱ्यांनी बोंबा बोंब आंदोलन केले. या आंदोलनामध्ये शेतकरी व दुग्ध व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सहभागी होते. हे आंदोलन दीपक काटे, संस्थापक शिवधर्म फाउंडेशन, बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
“सहकारी दूध संघ वाढवून खाजगी दूध संघ कमी झाले पाहिजेत. खाजगी दूध संघाच्या मनमानी कारभारामुळे आज शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर कुचंबना होत आहे. सर्वात जास्त दूध संकलन ग्रामीण भागातून होत आहे पण त्यांच्याकडूनच कमी दराने खाजगी दूध संघाच्या मदतीने दूध घेतले जाते. शेती कमी राहिल्यामुळे काही शेतकऱ्यांना गाईचा चारा हा विकत घ्यावा लागत आहे. गाईचा चारा महागल्यामुळे शेतकऱ्यांना हा दूध व्यवसाय परवडणारा राहिला नाही.” – दीपक काटे, संस्थापक शिवधर्म फाउंडेशन, बारामती
नेमक्या काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?
३४ रुपयाच्या परिपत्रकाचे पालन होऊन शेतकऱ्याच्या दुधाला ३४ रुपये हमीभाव मिळावा
वंचित दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान मिळावे
३४ रुपये दर देण्याच्या शासन निर्णयाच्या आदेशाची पालन न करणाऱ्या खाजगी दूध संघावर कठोर कारवाई करण्यात यावी.
शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता असणारे मंत्री या विभागास मिळावेत व त्या मंत्र्यांनी स्वतःची काम करत फिरत न बसतात शेतकऱ्यांसाठी आत्मीयता ठेवून त्यांच्याकरता महत्त्वाची कामे करावीत अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
येत्या १९ तारखे पर्यंत शेतकऱ्याच्या दुधाला ३४ रुपये हमीभाव मिळाला नाही, आणि वंचित दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान मिळाले नाही तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दीपक काटे, संस्थापक शिवधर्म फाउंडेशन, बारामती यांनी दिला आहे.