ppcnews.in
पिंपरी(प्रतिनिधी ) दिनांक 4 डिसेंबर 2025 :– सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक पिंपरीमध्ये शासनाची व कामगार विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुमारे 205 कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना Liquidator यांनी कामावरून कमी केले होते.त्या संदर्भात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी मध्यस्थी केल्यानंतर सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले वेतन अखेर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागले आहे.बँकेच्या लिक्विडेटर कार्यालयामार्फत वेतनश्रेणीनुसार १ लाख ते ३ लाखांपर्यंतची रक्कम अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती कामगारांनी दिली असल्याची माहिती कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
शासनाच्या आदेशानुसार उद्या शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र शासनाचे शासकीय कामगार अधिकारी, त्यांची टीमसह, सेवा विकास बँक पिंपरीच्या मुख्य कार्यालयात तपासणीसाठी येणार आहेत. बँकेचे बेकायदेशीर क्लोझर व कामगार कपात याबाबत दाखल तक्रारींच्या शहानिशासाठी ही कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि संघटनेने घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे आज पहिली मोठी यशस्वी पायरी मिळाली आहे. मागील तीन वर्षांचे वेतन बाकी असून उद्या होणाऱ्या अधिकृत तपासणीनंतर पुढील कारवाईबाबत संघटना निर्णायक पाऊल उचलेल असे मत कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केले आहे.
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले हे स्वतः या तपासणीवेळी उपस्थित राहणार आहेत.त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या पत्रानुसार उद्याच्या तपासणीवेळी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले आहे.



















































