पुणे : “शिवरायांकडून आपण अनेक गोष्टी शिकलो, परंतु छत्रपती शिवराय हे एक असं ऐतिहासिक व्यक्तीमत्व आहे , ज्यांचा जितका अभ्यास करावा तितका कमीच आहे. शिवरायांकडून शिकता येतील अशा अनेक घटना, प्रसंग आजही मोडी लिपीच्या उदरात दडलेले आहे. ते उलगडायचे असतील तर मोडी लिपीचा अभ्यास करायला हवा, शिवरायांचं प्रेम ज्या भाषेला लाभलं ती मोडी भाषा जपायला हवी, असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले.
सुरेंद्र पठारे युवा मंच आणि राजाधिराज प्रतिष्ठान यांच्यावतीने चंदननगर मध्ये अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी वडगांव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेविका संजीलाताई पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे आदी उपस्थित होते.
या सोहळ्यात मोडी लिपीतील मजकुरापासून शिवरायांची भव्य ४० फुटी रांगोळी श्रुती पठारे यांनी साकारली. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, शाहीर गंगाधर रासगे, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती युवा धावपटू अवंतिका नराळे, महाराष्ट्राची लावण्यवती फेम नृत्यांगणा पुजा शेडे, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता युवा खेळाडू सिद्धेश चौधरी आणि मोडी लिपीची अभ्यासक श्रुती पाटील यांचा फाऊंडेशन’कडून सत्कार करण्यात आला.