पिंपरी, पुणे (दि. २ नोव्हेंबर २०२४) भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना आरपीआय (आठवले गट) महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. विशेषतः जेष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. कठीण काळात नेहमी आपली पाठराखण करणाऱ्या महेशदादा लांडगे यांच्या पाठीशी याही वेळी आपले आशीर्वाद असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले. महिला भगिनींनी यावेळी ठिकठिकाणी औक्षण करून महेशदादांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
सध्या विधानसभा निवडणूक आणि दिवाळी दोन्हीची धामधूम सुरू आहे. भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेशदादा लांडगे यांनी लक्ष्मीपूजन तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी पंचक्रोशीतील विविध गावांचा धावता दौरा केला. त्या त्या गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. स्थानिक मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले.
शनिवारी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याचा सण साजरा होत असताना त्यामागील पार्श्वभूमीचा उल्लेख यावेळी आमदार लांडगे यांनी केला. ते म्हणाले की एकदा शरद ऋतूत गोकुळातील लोकांनी इंद्राचा उत्सव सुरू केला. त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की, गोवर्धन पर्वतामुळे आपली उपजीविका होते तेव्हा तुम्ही इंद्रा ऐवजी गोवर्धनाची पूजा करा. श्रीकृष्णाचे ऐकून गोकुळातील लोकांनी तसेच सुरू केले. मात्र त्यामुळे इंद्राला राग आला. त्याने गोकुळावर मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केली दोन दिवस झाले तरी पाऊस थांबत नव्हता. सारे गोकुळवासी घाबरले श्रीकृष्णाला शरण गेले सर्वांचे रक्षण कर म्हणून विनंती केली. श्रीकृष्णाने ती विनंती मान्य केली व इंद्राचा गर्वहरण करण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वते एका करंगळीवर उचलला आणि त्याखालील सर्व गोकुळवासी लोकांचे रक्षण केले. म्हणून लोक गोवर्धन पर्वताची पूजा करतात. गोठ्यातील गाई बैलांना सजवून त्यांची सुद्धा या दिवशी पूजा करून मिरवणूक काढतात असे लांडगे यांनी सांगितले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा मिळाल्याने त्यांना अहंकार चढला आहे. श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे इंद्राचा गर्वहरण केला. तसेच भोसरी मतदार संघातील जनतेने विरोधकांचा गर्वहरण करून त्यांना आपली जागा दाखवून द्यावी असे आवाहन यावेळी आमदार महेशदादा लांडगे यांनी केले.