पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी)
लहान मुलगा यकृताच्या आजाराने ग्रस्त असून त्याला रुग्णालयात व्यवस्थित उपचार मिळत नसल्याची तक्रार घेऊन आलेल्या देहूरोड येथील पालकांना पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सहकार्य केले. आमदार बनसोडे यांनी रुग्णालयात फोन करून रुग्णाची परिस्थिती जाणून घेतली. तसेच त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचार करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले.
याबाबत माहिती अशी की, देहूरोड येथे रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील लहान मुलाला यकृताशी संबंधित आजार जडला. याबाबतचे निदान झाल्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. मागील काही दिवसांपासून मुलावर पिंपरी येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णालयातून मुलाला योग्य उपचार मिळत नव्हते.
रुग्णाच्या नातेवाईकांना समजले की, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे गेल्यास आपल्या समस्येचे समाधान होईल. त्यामुळे नातेवाईक आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात आले. नातेवाईकांनी आपली कैफियत अण्णांकडे मांडली. आपली सामाजिक बांधिलकी जपत अण्णा बनसोडे यांनी तात्काळ रुग्णालय प्रशासनाला फोन केला. रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांशी अण्णांनी चर्चा केली. रुग्णाची परिस्थिती आणि त्याच्यावर होत असलेले उपचार जाणून घेतले. त्यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीबाबत डॉक्टरांना सांगितले.
रुग्णावर योग्य उपचार करण्याच्या सूचना अण्णा बनसोडे यांनी डॉक्टरांना दिल्या. निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असताना देखील वेळ काढून अण्णांनी आपली कैफियत ऐकून तात्काळ फोन करून सूचना दिल्याने रुग्णाच्या नातेवाईकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. या मदतीबद्दल नातेवाईकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी अण्णांचे आभार मानले.