चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी पोलिसांकडे केली आहे.
याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन देण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की, नगरसेवक मडिगेरी यांना सोमवारी (दि. १) सायंकाळी महापालिकेत जबर मारहाण करण्यात आली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे व पंकज भालेकर या तिघांनी मिळून मडिगेरी यांना ही मारहाण केली. त्याबाबत स्वतः मडिगेरी यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना जबाब दिलेला आहे. त्यांना कोणी आणि का मारहाण केली हे पोलिसांसमोर स्पष्ट केले आहे.
या घटनेला चार दिवस उलटले आहेत. तरी देखील कारवाई झाली नाही. त्यामुळे दोषींवर दोन दिवसात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदारांनी निवेदनातून केली आहे.





















































