राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्यावतीने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय अभियान’ हाती घेतले असून त्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्यासाठी खास वेबसाईट लॉन्च केली आहे. https://bit.ly/RashtravadiPakshAbhipraay अशी या वेबसाईटची लिंक आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आपले अभिप्राय नोंदवून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील माणसांपर्यंत पोचून त्यांची पक्ष्याबद्दलची भूमिका जाणून घेण्याचा हा प्रयत्न असून राज्यात सर्वत्र हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे वाघेरे पाटील म्हणाले. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे, कायदा सेलचे अध्यक्ष गोरक्ष लोखंडे आदी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले, ‘२२ मे पासून पक्षाची वर्धापनदिन मोहीम सुरू झाली. आतापर्यंत ५ लाख लोकांपर्यंत पोहचलो आहोत. अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आतापर्यंत पक्षस्तरावर किंवा सरकारच्या माध्यमातून केलेल्या कोणत्या योजना, कामे तुम्हाला आवडली, पक्षाबद्दल आपणास काय वाटते, पक्षाकडून आपल्या कोणत्या अपेक्षा आहेत याची माहिती एका फॉर्मद्वारे कार्यकर्त्यांनी भरून द्यावयाची आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतही तीन वर्षांपूर्वी सलग पंधरा वर्षे पक्षाची सत्ता होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक प्रकल्प या शहरात आणले. अगदी मूलभूत सुविधांपासून रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, मनोरंजन, आरोग्य, शिक्षण, उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रांत प्रगती केली.
‘सध्या राज्य आणि देश कोरोनाच्या गंभीर संकटातून जात आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केली आहे की, त्यांनी हा उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा. आपल्यापुढे कोरोनाचे मोठे आव्हान आहे. या विषाणूच्या विरोधात झगडताना आतापर्यंत साडेतीन हजारांपेक्षा जास्त लोकांनी राज्यात जीव गमावला आहे. आपले डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी तसेच प्रशासकीय अधिकारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना विरुध्दची लढाई सक्षमपणे लढच आहेत. काही जणांनी या लढाईत आपले प्राण सुध्दा गमावले आहेत. या ख-या वीरांना भावपूर्ण ऋद्धांजली आणि सलाम ! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यासाठी शरद पवार यांनी राज्यभर रक्तदान शिबिराचे नियोजन जिल्हा आणि तालुका पातळीवर करण्यास सांगितले होते. त्यास भव्य प्रतिसाद देत संपूर्ण शहरात ५०० पेक्षा अधिक दात्यांनी रक्तदान करुन या लढाईत आपले योगदान दिले आहे. पवार साहेबांनी बूथ समित्या तयार व कार्यान्वित करण्याचे काम जिल्हा पातळीवर हाती घेतले होते.
या मोहिमंतर्गत संपूर्ण राज्यभरामध्ये कार्यकर्त्यांची नोंदणी झाली आहे. जिल्हाभरातील लोकांना मदत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते सक्रिय आहेत. रेशन वितरण, वैद्यकीय शिबिरे, अन्न वितरण यासारखे लोक उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. मागील १० ते १५ वर्षामध्ये पिंपरी चिंचवड शहरात खालील प्रमाणे विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत. अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी देत या अबियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.





















































