अजित पवार यांना राजकीय क्षेत्रासह अवघ्या महाराष्ट्रात ‘दादा’ म्हणून ओळखले जाते. त्यातच आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या एका बहिणीने ‘अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे’ अशी इच्छा व्यक्त केली आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्त डॉ. रजनी इंदुलकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बातचीत केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एकदिवस पंतप्रधानपदी बघायचे आहे. तसेच, अजितदादांना सुद्धा मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. आमच्या सर्वांच्या मनातील इच्छा एक दिवस पूर्ण व्हावी, अशी आशा आहे, असे डॉ. रजनी इंदुलकर यांनी म्हटले आहे.
डॉ. रजनी इंदुलकर म्हणाल्या, “दादा तुम्ही सगळ्यांसाठी, फक्त आमच्यासाठी नाही, तर समस्त कार्यकर्त्यांसाठी, न ओळखीच्या माणसांसाठी, लाखो-लाखो महाराष्ट्रातच्या लोकांसाठी कामे केली आहेत. सतत तुम्ही त्यांना काही तरी देत आला आहात. कधीतरी आपल्या मनात काय आहे, काय चाललंय किंवा आपलं दु:ख काय आहे, ते कधीतरी शेअर करा. तुमचेही काही टेन्शन असतील ते वाटायला आवडेल. पण, तुम्ही हे आतापर्यंत केले नाही. नेहमी एक चांगला हसरा चेहरा घेऊन आमच्यासमोर आला आहात, तर हीच आमची इच्छा आहे की, आम्हा बहिणींना तुमची दुख:ही काही असतील छोटी-मोठी ती हलकी करायची आम्हाला संधी मिळाली तर बरं होईल.”





















































