पिंपळे सौदागर,निर्भीड संवाद :- येथील कुणाल आयकॉन रोडवरील रोझलँड रेसिडेन्सीजवळ उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त राजमाता जिजाऊ उद्यान एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार असून माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज उद्यानाची पाहणी केली. तसेच अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून हे उद्यान लवकरात लवकर नागरिकांना खुले करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.नगरसेवक नाना काटे यांनी आज (सोमवारी) महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी व संबंधित उद्यानाचे ठेकेदार यांच्यासह सदर उद्यानाच्या चालू कामाची पाहणी केली.
यावेळी उद्यान विभागाचे कनिष्ठ अभियंता कुंभार, ठेकेदार मे. यशक असोशिएटचे प्रतीक शिरोळे, आर्किटेक्ट आदित्य ढमाले आदी उपस्थित होते.
या उद्यानासंदर्भात बोलताना नगरसेवक काटे म्हणाले की, पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी सुमारे ५ एकर जागेत हे अद्ययावत उद्यान तयार करण्यात येणार आहे.
यामध्ये जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळाचे मैदान, कृत्रिम गिर्यारोहण भिंत, लहान मुलांच्या बालउद्यानात पालकांना बसण्यासाठी गझीबो, लेझर फाऊंटन आणि वाटर गार्डन, लहान मुलांसाठी स्केटिंग ट्रॅक, गझीबो आणि क्रिपर पवेलियन, जेष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम, स्वतंत्र मेडिटेशन सेंटर आणि योगा सेंटर, ओपन लायब्ररी, परगोला आणि फ्लावर गार्डन, हँगिंग गार्डन, फ्लावर वॉल, टॉपरी गार्डन, श्रब मेझ, ओपन लॉन एरिया, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, ११० चारचाकी व १५० दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था यासह अनेक अत्याधुनिक सुखसोयींयुक्त असे हे उद्यान उभारण्यात येणार असून यासाठी सुमारे ६ कोटी खर्च येणार आहे. व हे उद्यान लवकरच नागरिकांसाठी खुलेही करण्यात येईल, असे आश्वासन नाना काटे यांनी यावेळी दिले





















































