सांगवी–नवी सांगवी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३२ मधून अपक्ष उमेदवार दिलीप तनपुरे यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना कप–बशी हे चिन्ह बहाल करण्यात आले आहे. हे चिन्ह म्हणजेच आपले राजकीय गुरू स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांचे आशीर्वाद असल्याची चर्चा सांगवी व नवी सांगवी परिसरात नागरिकांमध्ये होत आहे.
कोणताही गाजावाजा, मिरवणूक अथवा शक्तीप्रदर्शन न करता, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करत दिलीप तनपुरे यांचा प्रचार सुरू आहे. घरोघरी जाऊन ते थेट मतदारांशी संवाद साधत असून, प्रचारादरम्यान केवळ सात जणांसोबत(त्यामध्ये पत्नी मंदाकिनी तनपुरे यांचा समावेश) ते प्रचार करत आहेत. त्यामुळे जनतेला वेठीस न धरता देखील प्रचार करता येतो, हे आदर्श उदाहरण त्यांनी प्रभाग क्रमांक ३२ मध्ये घालून दिले आहे.
दिलीप तनपुरे यांनी नागरिकांशी संवाद साधताना स्पष्ट भूमिका मांडली असून, निवडून आल्यानंतर प्रभागातील कोणताही निर्णय हा जनतेच्या सहभागाशिवाय घेतला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. विकासकामे असोत अथवा प्रभागाच्या हिताचे निर्णय, सर्व बाबींमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरसेवक पद हे मालक होण्याचे नसून, ते जनतेने उमेदवारावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. ज्या प्रकारे एखाद्या संस्थेचा ट्रस्टी विश्वासाने काम करतो, त्याचप्रमाणे आपण प्रभागाचा ट्रस्टी म्हणून काम करून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू, असे दिलीप तनपुरे यांनी सांगितले.
त्यांच्या या साध्या, शांत आणि लोकाभिमुख प्रचारपद्धतीमुळे प्रभाग क्रमांक ३२ मध्ये अपक्ष उमेदवार दिलीप तनपुरे यांची चर्चा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.





















































