पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदावर जुन्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘घंटा भेट’ देण्यात येणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिली आहे.
दि. १३ एप्रिल ला मंत्रालय व ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन ही प्रतीकात्मक ‘घंटा भेट’ देण्यात येणार आहे. शहरातील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून सातत्याने आंदोलन, मोर्चे काढण्यात आले असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्त्यांवर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हेही दाखल झाले आहेत. तरीदेखील जुन्या कार्यकर्त्यांना अपेक्षित न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे दोन नगरसेवक निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले होते. आगामी निवडणुकीत तीन नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, तरीही स्वीकृत नगरसेवक पदासाठी जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, इतर पक्षांमध्ये नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात असताना भाजपमध्ये मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे तसेच अमित गोरखे यांनी जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट भेटून कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यात येणार असून, स्वीकृत नगरसेवक पदासाठी जुन्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी करण्यात येणार असल्याचे काळभोर यांनी सांगितले.



















































