पिपीसी न्यूज नेटवर्क,
पुणे : पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान महापौर मंजुषा ताई दीपक नागपूरे यांनी भूषविले.
बैठकीत शहरातील सुरू असलेल्या गॅस पाइपलाइन कामांचा तसेच प्रस्तावित प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. MNGL कडून विविध भागांतील कामांची सद्यस्थिती, पाइपलाइन कव्हरेज आणि आगामी विस्तार आराखड्याची माहिती सादर करण्यात आली.
महापौरांनी शहरातील ज्या भागांमध्ये अद्याप गॅस पाइपलाइन सेवा पोहोचलेली नाही, त्या भागांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. तसेच सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सूचना करण्यात आल्या.
यावेळी महापौर म्हणाल्या की, “पुणे शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, अखंड आणि सुलभ गॅस पुरवठा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिकता आहे. यासाठी MNGL व महापालिका यांच्यात समन्वय साधून प्रभावी कार्यवाही केली जाईल.”
या बैठकीस MNGL चे वरिष्ठ अधिकारी तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.



















































