पुणे : पुण्यातील परिस्थिती फार गंभीर असून लोकांना मास्क, फिजिकल डिस्टन्स ठेवावं लागणार आहे. पुण्यात कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे 50 टक्के खासगी बेड ताब्यात घेणार आहेत. 316 लसीकरण केंद्र शहर आणि ग्रामीण भागात आहेत, ती दुप्पट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्वांनी नियमांचे पालन योग्य प्रकारे करावे. अन्यथा नाइलाजस्तव 2 एप्रिलला गंभीर निर्णय घेणार असल्याचा इशारा उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला आहे.
आढावा बैठकीनंतर पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. 1 एप्रिल पासून जे काही कार्यक्रम आहेत जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खासगी कार्यक्रम बंद केले पाहिजेत. लग्न लॉनमध्ये करा किंवा आणखी कुठे संख्या 50 पेक्षा जास्त असता नये. अंत्यविधीला 20 पेक्षा जास्त लोक नकोत. कोरोना रुग्णांची संख्या मागील वेळेपेक्षा वाढली आहे. रात्रीची संचारबंदी पुन्हा सुरू होणार आहे. नियमांचे पालन केले नाही, तर असेच पुढील 5-6 दिवस सुरु राहिले तर 2 एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.
लग्न सोडून इतर समारंभ पूर्ण बंद करावेत. उद्यान, बाग बगीचे सकाळीच सुरू राहणार. मॉल, मार्केट, चित्रपट गृह 50 टक्के उपस्थितीमध्ये सुरु ठेवण्यात येतील. सार्वजनिक वाहतूक सुरूच ठेवणार, ऑक्सिजन प्लँट चाकण जवळ झालाय त्यामुळे पुरवठा सुरळीत, कमी पडला तर राजगडमध्ये बोलून ठेवत आहोत. पुणे शहराच्या जम्बो केंद्रातील बेड पूर्ण क्षमतेने सुरू करणार, पिंपरी चिंचवडमधील जम्बो 1 एप्रिलपासून पूर्ण वापरत आणणार, ससून 300 ऐवजी 500 कोविड बेड करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील. 10वी / 12 वी परीक्षा वेळेत होतील.विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असेही पवार म्हणाले.