कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका असमर्थ ठरली असल्याचा केला आरोप
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे महापालिका ही असमर्थ असल्याचे निदर्शनास येत आहे. कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नाहीत. आरोग्य सुविधांचे तीनतेरा वाजले आहेत. पुणे शहरातील मृत्यूदर वाढला असून यामध्ये गोरगरीब मजूर जनतेचे हाल होत आहेत. कष्टकरी, मध्यमवर्गीय नागरिक हे बलाढ्य हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकत नाहीत. यासाठी किमान पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने योग्य दखल घेऊन योग्य उपचार सुविधा उपलब्ध देण्याची गरज असताना कोव्हिड सेंटरमध्ये दिवसाला फक्त १०० कोरोना टेस्ट होत आहेत. खासगी व सरकारी कोरोना टेस्ट चे रिपोर्ट यामध्ये तफावत दिसून येते. असे अनेक आरोप करत कायद्यानुसार महापालिका बरखास्त करण्यात यावी. मागणी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी केली आहे.
जाधव म्हणाले की, जनसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या कोरोना टेस्ट मधे वाढ करणे गरजेचे आहे , मात्र यावर कोणतेही पाऊल पुणे महानगरपालिका सत्ताधारी पक्ष घेऊन इच्छीत नाही. महाराष्ट्र शासनाच्या मंजुरी नंतरही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून भरती होणाऱ्या आरोग्य सुविधेत सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांची भरती प्रक्रिया कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. ही का प्रलंबित आहे याच्या मागील राजकारण व कारण समजत नाही.
त्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्त किरण कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, अति. आयुक्त सुरेश जगताप, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बरखास्तिची केली केली आहे. तसेच महानगरपालिकेच्या सत्ताधारी पक्षाचा भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या दिलेल्या नियमावली नुसार जर महानगरपालिका कर्तव्य बजावण्यास असमर्थ असेल तर १९४९ चे कलम ४५२ नुसार सदर मागणी रास्त असून लवकरच याबाबत निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी केली आहे.