भोसरीत भाजपमध्ये उफाळला अंतर्गत संघर्ष
पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. पक्षातील दोन प्रमुख चेहरे – सचिन काळभोर आणि आमदार महेश लांडगे – यांच्यातील जुना संघर्ष आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र झाल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड महापालिकेत सात स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
‘आखाडा पार्टी’वरून सुरू झालेला वाद
विधानसभा निवडणुकीच्या काळात सचिन काळभोर यांनी आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या ‘आखाडा पार्टी’ कार्यक्रमालाही काळभोर यांनी जाहीर विरोध दर्शविला होता. भाजपची संस्कृती हिंदुत्ववादी असून दारू-मटणाच्या कार्यक्रमांशी तिचा संबंध नसल्याचे मत त्यांनी मांडले होते. या विरोधानंतर पुढील निवडणुकीत संबंधित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक पातळीवर चर्चेत आहे.
यानंतर चिखली येथील टाऊन हॉलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी गेले असताना काळभोर यांना धमकी दिल्याचा आरोपही पुढे आला होता. या घटनांमुळे दोन्ही नेत्यांमधील संघर्ष उघड झाला.
२०१७ पासून वाढलेली ताकद
प्रभाग क्रमांक १३ मध्ये २०१७ साली प्रथमच भाजपचे दोन नगरसेवक निवडून आले. त्यानंतर २०२६ मध्ये तीन नगरसेवक विजयी झाले. निगडी गावठाण आणि परिसरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यात सचिन काळभोर यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. शहरातील पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलने, मोर्चे व निवेदने देत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे त्यांची ओळख शहरात आक्रमक कार्यकर्ता म्हणून निर्माण झाली.
तिकीट नाकारले, तरी प्रचारात सक्रिय
निवडणुकीच्या वेळी आमदार लांडगे यांनी काळभोर यांना तिकीट देण्यास विरोध केल्याची चर्चा आहे. काळभोर यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली होती. मात्र स्थानिक पातळीवरील विरोधामुळे त्यांना संधी मिळाली नाही. तरीही त्यांनी अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी प्रचारात सहभाग घेतला.
विशेष म्हणजे २०१४ मध्ये लांडगे अपक्ष उमेदवार असताना भाजपचे अधिकृत उमेदवार एकनाथ पवार यांच्या प्रचाराची धुरा निगडी भागात काळभोर यांनी सांभाळली होती. त्यानंतर दोघांमधील राजकीय मतभेद वाढत गेल्याचे बोलले जाते.
स्वीकृत नगरसेवक पदावरून तणाव
आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत सात स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. या पदासाठी सचिन काळभोर इच्छुक असून त्यांनी शहर भाजपमार्फत दावा केला आहे. मात्र आमदार लांडगे यांनी त्यांच्या नियुक्तीला उघडपणे विरोध दर्शविल्याचे समजते. इतर इच्छुक कार्यकर्त्यांना समर्थन देण्याची तयारी दर्शवली असली, तरी विरोध केवळ काळभोर यांनाच असल्याची चर्चा आहे.
निर्णयाकडे लागलेले लक्ष
भाजपकडून निष्ठावंत व जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत काळभोर यांना संधी मिळणार की त्यांना बाजूला सारले जाणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. भोसरीतील भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा पुढील टप्पा काय असेल, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



















































