पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड शहरात हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात सांगवी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले एकूण १३० मोबाईल फोन सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढत ते संबंधित तक्रारदार व मूळ मालकांना परत करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस उप आयुक्त संदीप आटोळे (परिमंडळ १) व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे (सांगवी विभाग) यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल नांदेकर तसेच पोलीस अंमलदार राजाराम माने यांनी सीईआयआर पोर्टलचा वापर करून हरवलेले मोबाईल शोधण्याची कारवाई केली.
शोधण्यात आलेले मोबाईल आज ०७ मार्च रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या हस्ते संबंधित मालकांना परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असून त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
नागरिकांकडून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे पोलिसांना अशा प्रकारे नागरिकांसाठी अधिक तत्परतेने काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.



















































