प्रतिनिधी: (ppcnews.in)
पुणे: -जायका नदी सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू असलेल्या ड्रेनेज कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काम चालू असताना पाच कामगार अचानक त्या ठिकाणी अडकले. यामध्ये दोन जणांनी मातीचा ढिगारा अंगावर पडण्याआधीच प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवत पळ काढला. मात्र उरलेल्या तिघांपैकी दोन जखमी कामगारांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दुर्दैवाने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर माध्यम प्रतिनिधींनी जबाबदारी ठरवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्व घटनेबाबत प्रशासनाकडून वारंवार गोंधळात टाकणारी माहिती दिली जात होती. काही वेळा मृतांची संख्या सहा, कधी चार, तर कधी आठ सांगण्यात येत होती. यामुळे नेमका मृतांचा आणि अडकलेल्या व्यक्तींचा आकडा काय, हे स्पष्ट न होण्यामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर शंका घेतली जात आहे.

घटनेवेळी तिथे पोकलेन मशीन काम करत होती, त्यावेळी हे मजूर नेमके तिथे कशासाठी गेले होते? त्यांना योग्य ती सुरक्षा देण्यात आली होती का? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. या दुर्घटनेमुळे एक मजूर जीव गमावून बसला, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा आणि दुर्लक्षच त्याला जबाबदार असल्याचा आरोप जोर धरू लागला आहे.
यासंदर्भात विचारणा केली असता, अनेक अधिकाऱ्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली असून, ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यासही स्पष्ट नकार दिला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.





















































