विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील परीक्षांबाबतचा निर्णय अखेर जारी झाला असून जे विद्यार्थी आतापर्यंत उत्तीर्ण झाले आहेत त्यांची परीक्षा होणार नसल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली. तसेच एटीकेटीसंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतचा अध्यादेश शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केला तसेच उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी विद्यापीठाला लिहून कळवायचे आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी हवी आहे अशांनीदेखील विद्यापीठाला लेखी स्वरूपात कळवावे असे निर्णय झाले असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा राज्यात कोरोनाचा प्रभाव कायम आहे त्यामुळे आताच्याघडीला परीक्षा घेणे कोणत्याही विद्यापीठाला जमणार नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उदय सामंत यांची बैठक 18 जूनला पार पडली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल असा निर्णय घेतला. शुक्रवारी उच्च व तंञशिक्षण विभागाच्यावतीने अध्यादेश काढत आतापर्यंत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय जारी केला.
व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही निर्णय लागू होणार
अभियांत्रिकी, हॉटेल मेंनेजमनेट, आर्किटेकचर, मॅनेजमेंट, फार्मसी अभ्यासक्रम यासारख्या व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीत त्या अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थांना पत्र लिहून या परीक्षा रद्द करण्यात याव्यात तसेच विद्यार्थ्यांसमोर ऐच्छिक परीक्षा देण्याचा पर्याय ठेवला असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात आले. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे आहे. त्यांनी विद्यापीठाला लेखी स्करूपात लिहून द्यायचे आहे. त्यानुसार विद्यापीठ त्याच्या मागील परीक्षेच्या आधारावर निकाल तयार करणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला तसे लिहून देणे आणि विद्यापीठाने त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी करणे अपेक्षित आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करतांना जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक तयार करायचे आहे. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत सर्क कुलगुरू आणि अधिकारी बैठक घेऊन पुढील 2 दिवसात निर्णय घेणार आहेत.




















































