लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांना संसर्ग झाल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिक, ठेकेदार यांना महापालिका भवनात प्रवेश बंद केला आहे. या सर्वांना तीस जूनपर्यंत ‘नो एंट्री’ असेल.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिका मुख्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिक, ठेकेदार यांना शनिवारपासून ३० जूनपर्यंत पालिकेत ‘नो-एंट्री’ असणार आहे. या प्रवेशबंधीचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज काढला आहे.
नागरिकांनी पालिकेशी संबंधित कामकाजाकरिता दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल, व्हॉट्सअॅपचा वापर करावा. ते ग्राह्य धरून प्रश्नांचे निराकरण करण्यात येईल, असेही आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
महापालिका मुख्यालयातील उपअभियंता, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, नगरसेविकेसह कुटुंबातील पाच जण आणि एका नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा जणांना संसर्ग झाला आहे.
यामध्ये, करसंकलन विभागीय कार्यालये व प्रभाग कार्यालयातील कर भरणा विषयक कामकाज वगळता ३० जून २०२० पर्यंत महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये प्रवेशबंद असणार आहे. नागरिक, ठेकेदारांसह इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार लॉकडाउनच्या अनुषंगाने शासकीय कामकाजासाठी ई-मेल, व्हॉट्सअॅपचा वापर ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार नागरिक, ठेकेदारांनी महापालिका सेवेशी संबंधित कामकाजाकरिता दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल, व्हॉट्सएॅपचा वापर करावा. या माध्यमांद्वारे प्राप्त अर्ज, निवेदने, तक्रारींबाबत संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करुन त्याच माध्यमांद्वारे संबंधितास कळविण्यात यावे, असे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.





















































