ppcnews.in
नवी सांगवी | प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे आंदोलनाचे शिल्पकार मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पुणे–पिंपरी चिंचवड दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नवी सांगवी येथील अपक्ष उमेदवार पसरणीकर अमित पायल यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनातील ‘चलो मुंबई’ या ऐतिहासिक आंदोलनाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मुंबई येथे पार पडलेल्या भव्य मराठा मोर्चाच्या वेळी सांगवी फाटा येथे मोर्चा आला असता . त्यावेळी अमित पसरणीकरांनी केलेल्या जंगी स्वागताची चर्चा झाली होती. त्या दोघांच्या भेटीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला . हि आठवण त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी शेअर केली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत जरांगे पाटील यांनी पसरणीकर अमित पायल यांना “विजयी भव” असा आशीर्वाद दिला. अपक्ष उमेदवारी निश्चित केल्यानंतर मिळालेला हा आशीर्वाद अत्यंत मोलाचा असल्याची भावना पसरणीकर यांनी व्यक्त केली.
जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारल्याचे पसरणीकर अमित पायल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. प्रभागातील सर्व स्तरातील नागरिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत असून, गेल्या अनेक वर्षांत केलेल्या सामाजिक कार्याची ही पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.





















































