ppcnews.in
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९(अ) मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार सूर्यवंशी सागर गोपाळ हे ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पत्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे सागर गोपाळ यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
सूर्यवंशी सागर गोपाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजमाध्यमे आणि विविध व्यासपीठांवरून जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांशी सातत्याने पत्रव्यवहार करून विविध नागरी प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याचे नमूद करण्यात आले.
निवडून आल्यास पाणीपुरवठा, रस्ते, गटार व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण, युवक विकास, रोजगारनिर्मिती, महिला स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन, पारदर्शक प्रशासन, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या तक्रारींसाठी खुल्या कार्यालयीन वेळा या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. डिजिटल शिक्षण सुविधा, गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





















































