पिंपरी-चिंचवड :
पिपीसी न्यूज प्रतिनिधी,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही नियुक्ती करण्यात आली असून, महापालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात प्रभावी भूमिका बजावण्याची जबाबदारी भोईर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र भाजपचे ८४ नगरसेवक निवडून आल्याने महापालिकेतील सत्ता भाजपकडे आहे. याच पार्श्वभूमीवर सक्षम, अनुभवी आणि प्रशासनाची सखोल जाण असलेला चेहरा म्हणून भाऊसाहेब भोईर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
भाऊसाहेब भोईर गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात सक्रिय असून, त्यांनी आतापर्यंत पाच वेळा नगरसेवक म्हणून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. प्रशासनावर मजबूत पकड, अभ्यासू वृत्ती आणि आक्रमक पण संतुलित भूमिका ही त्यांची ओळख मानली जाते.
सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे, जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि महापालिकेतील लोकशाही अधिक बळकट करणे, अशी ठाम भूमिका भोईर यांनी मांडली आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ महापालिकेतील विरोधी पक्षाला निश्चितच होईल, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.


















































