नवी सांगवी | प्रतिनिधी
पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
नवी सांगवी येथील कै. य. धो. टण्णू प्राथमिक शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘सावित्रीबाई दत्तक पालक योजना’ अंतर्गत दरवर्षी समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जाणणाऱ्या अनेक दानशूर व्यक्तींनी ‘खारीचा वाटा’ उचलत गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी मोलाची मदत केली आहे. या योजनेमुळे शाळेची फी भरण्यास अडचण येणाऱ्या विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असून अनेक पालकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आहे.
याप्रसंगी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांनी आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचे सांगितले. गेल्या बारा वर्षांपासून शाळेने मला या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिली असून पुढील काळातही अशीच सेवा करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका लता सावळे यांनी दानशूर मान्यवरांच्या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोलाची साथ मिळत असल्याचे नमूद केले. या उदात्त हेतूने करण्यात आलेल्या मदतीमुळे अनेक विद्यार्थिनींचे भविष्य उज्ज्वल होईल, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, लक्ष्मण पोळ, योगिता रावडे, सौरभ निकाळजे, मुख्याध्यापिका लता सावळे, स्मिता मॅडम, विनोद कदम, रत्नाकर राऊत, दिपाली बोरकर, स्नेहा मॅडम, शुभांगी ओव्हाळ, राजश्री पतंगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दरेकर सर यांनी केले तर उषा पोळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
















































