पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड : शहराच्या राजकारणात स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्त्यांबाबत चर्चेला उधाण आले असताना भारतीय जनता पक्षाचे जुने व आक्रमक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अधिकृत दावेदारी दाखल केली आहे. त्यांनी महापौर रवी लांडगे यांच्याकडे आपला अर्ज सादर करत पक्ष नेतृत्वाकडे संधी देण्याची मागणी केली आहे.
सचिन काळभोर हे पक्षनिष्ठ आणि रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, अनधिकृत बांधकामे तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांसारख्या विविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी मोर्चे, आंदोलने आणि निवेदने देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या आंदोलनांमुळे त्यांच्या विरोधात काही पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले असले तरी त्यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली.

केंद्रीय नेतृत्वाशी निष्ठा राखत काम करणारे कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षांतर्गत काही वाद निर्माण झाले होते. मात्र त्या काळातही त्यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आपली भूमिका ठाम ठेवली होती. पक्षातील जुने, निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“पक्षासाठी वर्षानुवर्षे झटणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. अन्यथा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढू शकते,” असे मत काळभोर यांनी व्यक्त केले. निवडणुकीचे तिकीट न मिळाल्यानंतरही त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नसल्याचे सांगत स्वीकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, त्यांच्या या दावेदारीकडे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक आमदार यांचे लक्ष लागले असून, अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सचिन काळभोर यांची दावेदारी ही केवळ वैयक्तिक मागणी नसून जुने आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधित्वाची चाचणी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.





















































