पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज नागरिकांना थेट पाहता यावे यासाठी ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिका ही राज्यातील महत्त्वाची आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखली जाणारी संस्था असून शहराच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय सर्वसाधारण सभेत घेतले जातात. या सभेत शहराच्या हिताचे विविध ठराव मंजूर केले जातात, विकासकामांवर चर्चा होते तसेच नागरिकांच्या कररुपी पैशांचे नियोजन केले जाते. त्यामुळे या कामकाजात पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधींनी सभागृहात कोणते प्रश्न मांडले, प्रशासनाची भूमिका काय आहे आणि निर्णय प्रक्रिया कशी पार पडते हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. प्रशासनात पारदर्शकता राहावी आणि नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी सर्वसाधारण सभेचे कामकाज महापालिकेच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल किंवा फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपित (Live Streaming)करण्याची गरज असल्याचे भोईर यांनी म्हटले आहे.
मुंबई, पुणे आदी महापालिकांमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध असून पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करून हे पाऊल उचलणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
जनहित आणि पारदर्शकतेचा विचार करून आगामी सर्वसाधारण सभांपासून लाईव्ह प्रक्षेपण सुरू करण्याबाबत संबंधित विभागास तातडीने आदेश द्यावेत, अशी विनंती विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी आयुक्तांकडे केली आहे.





















































