पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी प्रतिनिधी:
पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत सर्व धर्मीय नागरिकांच्या अंत्यसंस्काराचा खर्च मनपाने उचलण्याबाबतच्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भाऊसाहेब भोईर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व धर्मीय व्यक्तींच्या अंत्यसंस्काराचा खर्च महापालिकेकडून करण्याच्या योजनेला स्थायी समिती ठराव क्र. ४५५ व महापालिका समिती ठराव क्र. ४८५ द्वारे मंजुरी देण्यात आली आहे. तसेच त्या अनुषंगाने प्रशासनाने आदेशही पारित केलेले आहेत. मात्र अद्याप या जनहिताच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात राज्यातील तसेच देशातील विविध भागांतून आलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे वास्तव आहे. अनेक वेळा आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अंत्यसंस्काराचा खर्च करणे कुटुंबीयांना कठीण जाते. अशा परिस्थितीत ही योजना सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा देणारी ठरणार असल्याचे भाऊसाहेब भोंईर यांनी नमूद केले आहे.
तसेच नाशिक , मुंबई , अंबरनाथ आणि कोल्हापूर या महापालिकांमध्ये अशा प्रकारच्या योजना यशस्वीपणे राबविल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोंईर यांनी केली आहे.



















































