पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
सांगवी (पुणे) : शेअर मार्केटमधील पी.के. प्रॉफिट ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते २० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी मिळून तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नवी सांगवी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणी प्रतीक संजय तोडमल (वय २९, व्यवसाय – व्यवसाय, रा. समर्थनगर, साई चौक, नवी सांगवी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण विठ्ठल काटकर (वय ३३) व्यवसाय – नोकरी, रा.समर्थनगर, सर्व्हे नं. ७४/१, नवी सांगवी, पुणे. याने फिर्यादी तसेच त्यांचे ओळखीचे दीपक लोढे व अक्षय सुतार यांना शेअर मार्केटशी संबंधित पी.के. प्रॉफिट ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
या आमिषाला भुलून दीपक लोढे यांनी ५ लाख रुपये तर अक्षय सुतार यांनी २ लाख रुपये गुंतवणूक केली. तसेच फिर्यादीकडूनही २,५०,००० रक्कम घेण्यात आली. दरमहा नफा देतो व वर्षभरानंतर संपूर्ण मुद्दल परत करतो, असे सांगून लेखी करार करण्यात आला होता. मात्र त्यानंतर कोणताही नफा अथवा रक्कम परत न देता आरोपींनी एकूण ११ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना ८ एप्रिल २०२३ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत घडली असून या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३१६(२), ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण पाटील करत आहेत.



















































