पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड : निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला असून जेष्ठ नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका तरुण दांपत्याची लाखो रुपयांची फसवणूक टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. १९ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास एका तरुणास व्हॉट्सअॅप कॉलद्वारे अज्ञात व्यक्तीकडून संपर्क साधण्यात आला. संबंधित व्यक्तीने स्वतःला मुंबई पोलीस क्राईम ब्रांचमधील अधिकारी असल्याचे सांगत, तरुणाच्या नावावर पार्सल आल्याचे सांगितले. त्या पार्सलमध्ये ५ पासपोर्ट तसेच एम.डी. ड्रग्स आढळल्याचा बनाव करून त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.
यानंतर आरोपींनी तरुण व त्याच्या पत्नीला ‘सिग्नल’ अॅप डाउनलोड करण्यास सांगून व्हिडिओ कॉलवर ठेवले आणि पोलिस अधिकारी असल्याचा आव आणत धमकावले. “तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे” असे सांगत त्यांनी दांपत्याला भीती दाखवली. पुढील काही तास आरोपींनी सतत व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क ठेवून त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती व आधार तपशील घेतले.
तसेच, तरुणाकडून म्युच्युअल फंडमधून १२ लाख रुपये काढण्यास भाग पाडून ते पैसे आरोपींना पाठवण्याचा दबाव टाकण्यात आला. या दरम्यान घाबरलेल्या तरुणाने आपल्या वडिलांना ही बाब सांगितली. संबंधित वडील जेष्ठ नागरिक (वय ७१ वर्षे) असून त्यांनी तत्काळ सावधगिरी बाळगत पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिस अंमलदार सोपान बोधवड, मुकुंद वारे व महिला अंमलदार स्नेहा म्हस्के यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन दांपत्याला ‘डिजिटल अरेस्ट’ ही पूर्णपणे बनावट संकल्पना असल्याचे समजावून सांगितले. यामुळे मोठी आर्थिक फसवणूक टळली.
या प्रकरणात पोलिस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तसेच पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नागरिकांच्या सतर्कतेचे कौतुक केले आहे.
नागरिकांसाठी आवाहन :
‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही कायदेशीर संकल्पना अस्तित्वात नाही. कोणताही पोलिस अधिकारी व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाही. अशा प्रकारचे कॉल आल्यास घाबरून न जाता त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


















































