पुणे महानगरपालिका हद्दीतील पाषाण तलाव परिसरात गंभीर प्रदूषणाचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी चार अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पिपीसी न्यूज नेटवर्क,
दि. १० एप्रिल २०२६ रोजी महापालिका आयुक्तांनी पाषाण तलाव परिसराची पाहणी केली असता, संबंधित भागातील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. परिणामी, शुद्धीकरण न केलेले मैलापाणी थेट तलावात सोडण्यात आल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी निर्माण झाली. तसेच तलावातील पाणी दूषित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळून आले. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची मानण्यात आली आहे.
या घटनेची तातडीने दखल घेत, महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मलनिःसारण व देखभाल दुरुस्ती विभागातील कार्यकारी अभियंता अजयकुमार दत्तात्रय वायसे आणि कनिष्ठ अभियंता अतुल कुमार पांडुरंग कडू यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६(२)(फ) अंतर्गत खातेनिहाय चौकशी सुरू करून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

तसेच, आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक चोपडे आणि विभागीय आरोग्य निरीक्षक भोईर यांच्यावरही खातेस्तरावरून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.



















































