पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड : सायबर पोलिस ठाण्याने तत्पर कारवाई करत सायबर फसवणुकीत गेलेली ५६ लाख रुपयांची संपूर्ण रक्कम तक्रारदाराला परत मिळवून दिली आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.
तक्रारदार संजय जाधव यांनी सायबर फसवणुकीबाबत अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. संजय जाधव यांची PHBB Valves Pvt. Ltd. ही कंपनी असून त्यांचा परदेशातील Wenzhou Artech Machinery Technology Co. Ltd. या कंपनीसोबत व्यवहार सुरू होता.
अज्ञात आरोपींनी संबंधित परदेशी कंपनीसारखा भासणारा बनावट ई-मेल आयडी तयार करून बँक खात्याची माहिती बदलली आणि नवीन खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. हा ई-मेल खरा असल्याचे समजून तक्रारदारांनी ५६ लाख रुपये सिटीझन बँक, यू.एस.ए. येथील खात्यावर पाठवले.
नंतर संबंधित कंपनीशी संपर्क साधल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर तक्रारदारांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित बँकांशी समन्वय साधत परदेशातील खात्यातील रक्कम फ्रीज केली आणि आवश्यक कागदपत्रे व पाठपुरावा करून संपूर्ण रक्कम परत मिळवण्यात यश मिळवले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक रविकिरण नांदे, सपोनि प्रविण स्वामी, पोउपनि वैभव पाटील, पोउपनि प्रकाश कातकाडे, महिला पोलीस हवालदार रेणुका वाव्हळ (ब.नं. १९८३), पोहवा दिपक भोसले, पोहवा विनायक म्हसकर, तसेच पोलीस अमलदार सोपान बोधवड आणि माधव आरोटे यांनी विशेष कामगिरी बजावली.
सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांनी सतर्क राहून व्यवहार करताना ई-मेल, बँक तपशील यांची खातरजमा करावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.



















































