सीसीटीव्ही बंद, पोलिस गस्त अपुरी; रात्रपाळी रद्द करून दिवसपाळीची मागणी
पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
हिंजवडी आयटी पार्क परिसरात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पुढे आली आहे. रात्री उशिरापर्यंत, अनेकदा पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा मिळत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व समस्यांवर तातडीने कारवाई करून महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह कार्यपरिसर निर्माण करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी प्रशासनाकडे केली आहे. आता पोलिस व संबंधित यंत्रणा यावर कितपत गांभीर्याने उपाययोजना करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रात्रपाळीत सुरक्षेचा अभाव
आयटी कंपन्यांमध्ये रात्रपाळी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कंपनी परिसरात पुरेशी सुरक्षा नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचारी वर्गात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
छेडछाड आणि गुन्हेगारीची भीती
परिसरात गावगुंड व मद्यपींकडून महिलांना छेडछाड होत असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. रात्री उशिरा कामावरून बाहेर पडणाऱ्या महिलांना अशा घटनांचा सामना करावा लागत असून, त्यामुळे त्या भयभीत झाल्याचे चित्र आहे.
अतिक्रमण आणि बेकायदेशीर हालचालींमुळे समस्या तीव्र
आयटी पार्क परिसरातील रस्त्यांवर हातगाडी व टपरीधारकांनी अतिक्रमण करून रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवल्याने परिस्थिती आणखी बिघडली आहे. या ठिकाणी काही मद्यपी व्यक्ती दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच गांजा, चरस, एमडीसारख्या अमली पदार्थांचे सेवन होत असल्याच्या तक्रारींमुळे सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पोलिस गस्त वाढवण्याची मागणी
या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिस गस्त वाढवून महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
तक्रार पेटी व सुरक्षा उपाययोजनांची मागणी
महिला कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या मानसिक छळाच्या तक्रारी लक्षात घेता, कंपन्यांमध्ये तक्रार पेटी बसविण्याची सूचना देण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी आपले प्रश्न निर्भयपणे मांडू शकतील.
याशिवाय:
आयटी पार्क परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवणे
सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे
रात्रपाळीतील महिलांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करणे
अशा उपाययोजनांची मागणीही पुढे आली आहे.
रात्रपाळी रद्द करण्याची मागणी
महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्रपाळी (नाईट शिफ्ट) रद्द करून त्यांना दिवसपाळीत काम देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संभाव्य धोके कमी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
वाहतूक कोंडीमुळे वाढली अडचण
हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाढती वाहतूक कोंडी ही आणखी एक मोठी समस्या ठरत आहे. गर्दीच्या वेळी महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने यावरही तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुनेत्रा ताई पवार उपमुख्यमंत्री पुणे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त पुणे ह्यांना तक्रार दाखल करण्यात आली आहे सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता पिंपरी चिंचवड शहर महिला अधिकारी व कर्मचारी ह्यांना आय टी पार्टी ह्या ठिकाणी रात्रपाळी शिफ्ट रद्द करण्यात यावी म्हणून सुरक्षा व्यवस्था कोलमडून पडली आहे



















































