कोट्यवधीं रुपयांची आर्थिक उलाढाल मंदावली ; छोटे – मोठे व्यवसाय धोक्यात
पुणे : कायमस्वरूपी नोकरी मिळेल, तसेच अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. या आशेने विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. तसेच या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या व्यवसायांची तसेच उदयॊगांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्याच धर्तीवर यावर आधारीत असलेल्या व्यवसायांची तसेच उद्योग क्षेत्राची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.
स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक घोषित न होणे, तसेच रखडलेल्या सरळसेवाच्या परीक्षा न होणे, रखडलेले निकाल घोषित न होणे या सर्व गोष्टीमळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विदयार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. कोणत्याही परिक्षेचे नियोजन नसल्याने पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सातारा आदी जिल्ह्यात मोठ्या संख्येने तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे यावर आधारित असलेले व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. किमान परीक्षांचे नियोजित वेळापत्रक झाले तरी मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे विद्यार्थी येथेच थांबतील.असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तसेच राज्य शासनाच्या अयोग्य धोरणा मुळे रिक्त जागा असणाऱ्या विविध पदांची जाहिरात न काढल्या मुळे सर्व विद्यार्थी हे अस्थिर झाले आहेत, त्यामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा या क्षेत्रावर अवलंबून असणारे उद्योग व कामगार हे अडचणीत सापडले आहेत.
काय आहेत अडचणी
-राज्य शासनाच्या वतीने मागणी पत्र नाही.
– तसेच विविध विभागातील रिक्त जागा.
-स्पर्धा परीक्षा वर अवलंबून असणारी सर्व अर्थव्यवस्था मागील १ वर्षापासून अडचणीत सापडली आहे.
-या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या व्यवस्थेतून अंदाजे जवळपास ४-५ लाख जणांना (कामगार) भविष्य अडचणीत आले आहे.
– सुमारे ४ हजार कोटींची अर्थव्यवस्था स्पर्धा परीक्षांवर अवलंबून आहे.
-शासनाला या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून जवळपास हजारो कोटींचा महसूल मिळणारा स्त्रोत देखील बंद झाला आहे.
चौकट
-राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा वर्ग – सुमारे २५ लाखांहून अधिक
-केंद्रीय लोकसेवा अयोग ( युपीएसी) – १ लाखाच्या पटीत
एमपीएससी १३ लाख (गट – अ ते गट – क, तसेच सर्व डिपार्टमेंटल एक्झाम)
-सरळसेवा – ८ लाख
-केंद्रीय पातळीवरील परीक्षा – २-३ लाख
-बँकिंग – १ लाख
-पोलिस भरती, ५००० हुन अधिक पदांसाठी ९ लाख पेक्षा जास्त अर्ज.
कोट
कोरोनामुळे तसेच पुढे कोणतीही परीक्षा नसल्यामुळे मार्गदर्शन वर्ग बंद आहेत. त्यामुळे जाहिरात केली जात नाही. कुठेही जाहिरातीचे पोस्टर लावण्याचे काम राहिले नाही. पाम्पलेट छापले जात नाहीत. तसेच सायकलवर जाहिरात केली जात होती. तीही बंद झाली आहे. त्यामुळे उत्पन्न मिळत नाही.
-मयूर राजपूत, जाहिरात व्यावसायिक.
शाळा , महाविद्यालये बंद आहेत. त्यासोबतच स्पर्धा परीक्षांचे अनिश्चित स्वरूप यामुळे प्रिंटिंग व्यवसायला मोठा फटका बसला आहे. महिन्याला ६० ते ७० हजार पुस्तके छापली जात होती. आता ५ ते ६ पुस्तके छापली जात आहेत. जर एमपीएससीने किंवा सर्वच स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले तर व्यवसायांना उभारी येईल.
– पंडित शिंदे, छापाई व्यवसायिक.
पोलीस भरती, पोलीस उपनिरीक्षक आदी पदांसाठी मैदानी चाचणी द्यावी लागते. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अनेक प्रशिक्षक आहेत. यावर त्यांचे घर चालत होते. दोन ते तीन वर्षे परीक्षाच होत नसतील तर कसे होणार. यापूर्वी एमपीएससीकडून वेळापत्रक जाहीर करून त्याचे तंतोतंत पालन केले जात होते. त्यामुळे विद्यार्थी संख्या देखील मोठी होती. आर्थिक संकट कोसळले आहे.
प्रा. एम. एस कुमठाळे, प्रशिक्षक.
सुमारे ५० अधिक व्यवसाय धोक्यात
-मेस, हॉटेल, चहावाले, नाष्टाचालक, फळवाले, दूधवाले, मावशी, होस्टेल, अभ्यासिका क्लास, जनरल स्टोअर्स, बुकशॉप, प्रिंटिंग प्रेस, स्टेशनरी, पेपरचालक, केस कापणारे, रद्दी घेणारे, किराणामाल, इस्त्रीवाला, झेरॉक्सवाला, पेस्ट कंट्रोल करणारे, हातगाडी वरून स्नॅक्स विकणारे, रिक्षा चालक, कपडे विकणारे, ब्रोकर, स्पोर्ट मटेरियल विक्रेते, फिजिकल ट्रेनर, जिम, गॅरेज, मोबाईल शॉप अँड रिपेरींग, गॅसवाले, सिनेमा थेटर, मॉल, भाजीपाला विक्रेते, केकशॉप, पोस्टर लावणारे, डीटीपी करणारे, टाइपिंग करणारे, टेलर, पान स्टॉल, फ्लेक्स प्रिंटिंग,बेकरी उत्पादन इत्यादी..