1050 सदस्यांनी घेतला सहभाग
पुणे :प्रतिनिधी; (ppcnews.in)
डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकी मध्ये 9.50 टन निर्माल्य गोळा करण्यात आले. यावर्षी सुद्धा प्रतिष्ठानचे एक हजार पन्नास सदस्य यामध्ये सहभागी झाले होते. या निर्माल्य गोळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये श्री गणेश भक्तांकडून श्री गणपती मूर्ती बरोबर आणलेल्या निर्मल्याचे विलगीकरण करण्यात आले आणि मग ते वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून पुढे पाठविण्यात आले. गणेश भक्तांकडून जमा केलेल्या निर्माल्याचे खत तयार करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानकडून देण्यात आली. पद्मश्री,महाराष्ट्र भूषण डॉ श्री दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतिष्ठानचे हे काम गेले अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. गौरी आणि गणेश यांचे निर्मल्य हे योग्य ठिकाणी जात असल्याचे समाधान मिळत असल्याचे मत या ठिकाणी निर्माण देणारे नागरिक व्यक्त करत होते. आपल्या लाडक्या बाप्पाचे तसेच गौरीचे निर्माल्य योग्य ठिकाणी जमा करण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येत होते.हे निर्माल्य संकलित केल्यामुळे परिसरामध्ये होणारी दुर्गंधी घाण कचरा यापासून नागरिकांची सुटका होणार आहे.
त्यामुळे भविष्यामध्ये होणारे रोगराई नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. त्यानंतर या निर्माल्यापासून तयार झालेले खत हे प्रतिष्ठानच्या वतीने ज्या ठिकाणी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन केले आहे त्या ठिकाणी हे खत वापरले जाणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा पुणे शहरातील खडकवासला विसर्जन घाट ,दळवीवाडी, नांदेडगाव,धायरी कॅनल,विठ्ठलवाडी,शिवणे,वारजे,राजाराम पूल , नऱ्हे आंबेगाव, कोथरूड जीत मैदान, सुतारदरा,शांतीवन चौक,वीर सावरकर उद्यान, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, गरवारे पूल विसर्जन घाट, नवी पेठ समोरील डेक्कन झेड ब्रिज खालील विसर्जन घाट, वाघोली मांजरी, मुळशी तालुक्यातील भरे येथील पुलाखाली येथील विसर्जन घाटावर प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी निर्माल्य संकलित केले आहे.