पुणेः- नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट – एनआयपीएम या मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन के. एम. शिवकुमार, संचालक,मनुष्यबळ व्यवस्थापन विभाग, भारत इलेक्ट्रॉनिक लि. यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यंदाचा हा संशोधन ग्रंथ ‘मनुष्यबळ व्यवस्थापनातील तंत्रज्ञानामुळे व्यवसायाच्या शाश्वत विकासाला मिळणारी चालना ‘ (‘Technology In Human Resource Function Leading To Business Sustainability’ ) या मध्यवर्ती विषय संकल्पनेवर आधारित आहे.
या उपक्रमामुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या मनुष्यबळ व्यवस्थापकांना त्याचे संशोधन लेख प्रसिद्ध करण्याची संधी मिळाली हे अतिशय कौतुकास्पद आहे, असे मत या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी के. एम. शिवकुमार यांनी व्यक्त केले.
तर या उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रातील अध्यापक,संशोधक व औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापक यांचे अनुभव एकत्रित झाल्याने त्याचा व्यवस्थापन विद्याशाखेच्या विद्यार्थी, अध्यापक वर्गाला तसेच नव्याने उद्योग जगतात मनुष्यबळ व्यवस्थापन विभागात रुजू झालेल्यांना मार्गदर्शक म्हणून लाभ होईल असे एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले.
तर याप्रसंगी या संशोधन ग्रंथाचे संपादक डॉ.संतोष भावे, संचालक मनुष्यबळ व्यवस्थापक व औद्योगिक संबंध विभाग, भारत फोर्ज लि. यांनी सांगितले कि, या संशोधन ग्रंथात ४५ संशोधकांचे लेख समाविष्ट करण्यात आले असून एनआयपीएमच्या वतीने आणखी दोन संशोधन ग्रंथ या वर्षभरात प्रकाशित करण्यात येणार आहेत.




















































