पुणे, दि.(ppcnews.in)26 सप्टेंबर –
राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेल्या पार्श्वभूमीवर चिंचवड येथील शेतकरी नेते मारुती साहेबराव भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांना निवेदन पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “यंदा संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक पावसामुळे 65 लाख हेक्टरवरील पिके जलमय झाली असून, एकरी सरासरी 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मका, कापूस, सोयाबीन, मूग, फळबागा यासह गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, पशुधन, घरातील वस्तू व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे. तरीही शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे.”
भापकर यांनी शासनाच्या जाहिरातींचा मुद्दा उपस्थित करत “महाराष्ट्र शासनाने वर्षभरात वाढदिवस, देवा भाऊ यांसारख्या जाहिरातींवर, तसेच ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमावर शेकडो कोटी रुपये खर्च केले. या खर्चावर पूर्णविराम देऊन ती रक्कम पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरावी,” अशी मागणी केली.
तसेच निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यावर कोणतेही निकष न लावता 1500 रुपये जमा केल्याप्रमाणे, शेतकऱ्यांना विनाअट तातडीने प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच राज्य व केंद्र सरकारच्या मदतीतून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे हे निवेदन आता सरकारने गांभीर्याने घेऊन तातडीचे पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.