पिंपरी चिंचवड, दि. १९ प्रतिनिधी(ppcnews.in) – पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर येथे कार्यरत असलेले राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालय १०० खाटांचे असून येथे येणाऱ्या कामगार वर्गाला अद्यापही पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे रुग्णालय ३०० खाटांचे करण्यात यावे व आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे.
मोहननगर ईएसआयएस रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन, डायलिसिस यासारख्या महत्त्वाच्या सुविधा नाहीत. तसेच अति-विशिष्ट उपचारासाठी आवश्यक सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. त्यामुळे कामगार रुग्णांना उपचारासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. त्यामुळे वेळ, पैसा खर्च होऊन कामगार व त्यांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होते, असे भापकर यांनी निदर्शनास आणून दिले.
मोहननगर ईएसआयएस रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ४.५० लाखांपेक्षा जास्त विमा धारक कामगारांची संख्या आहे. नियमानुसार प्रत्येक १ लाख कामगारांमागे १०० खाटांचे रुग्णालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यमान १०० खाटांच्या ऐवजी ३०० खाटांचे रुग्णालय उभारण्याची गरज आहे, असे भापकर यांनी म्हटले आहे.
भापकर यांनी पुढील महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत –
१) मोहननगर ईएसआयएस रुग्णालय १०० वरून ३०० खाटांचे करावे.
२) एमआरआय, सीटी स्कॅन, डायलिसिससाठी आवश्यक यंत्रसामग्री व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत.
३) सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर व तज्ज्ञ कर्मचारी नेमावेत.
४) रुग्णालयाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत रहिवासी डॉक्टरांसाठी कायमस्वरूपी इमारत उभारावी.
या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी विनंती भापकर यांनी केली आहे.