दस्त नोंदणीतील गैर प्रकाराबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी
लोकजनशक्ती पार्टी (राम विलास) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे:(ppcnews.in)
सह-दुय्यम निबंधक हवेली क्र.२० मधील बेकायदेशीर दस्त नोंदणी, भ्रष्ट कारभाराविरुद्ध लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षा ने निवृत्त जिल्हा सह निबंधक पोपटराव भोई यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन त्यांनाही यासंबंधीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
लोकजनशक्ती पार्टी (राम विलास)चे अध्यक्ष संजय आल्हाट यांच्यासमवेत पुणे संपर्क प्रमुख राहुल उभे उपस्थित होते.निवेदनावर संजय आल्हाट,कायदेशीर सल्लागार निवृत्त सहाय्यक पोलिस अधीक्षक मिलिंद गायकवाड, राहुल उभे यांच्या सहया आहेत.
२० ऑगस्ट २०१४ ते १ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत केलेल्या नोंदींमध्ये २०१ दस्त नोंदणी संदर्भात अनियमितता झाल्याचा आरोप पक्षाने केला होता. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी अर्ज दाखल करण्यात आले होते.आंदोलन करण्यात आले होते.ग्रामपंचायत परवानग्या असलेल्या इमारतींमधील दस्त बेकायदेशीर रित्या नोंदवून बिल्डर लॉबी चे भले करण्यात आल्याचा आरोप यावेळी बोलताना पक्षाचे शहर,जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी केला. त्यानंतर शासनाने नेमलेल्या तपासणी पथकाने या प्रकरणात नोंदवहीतील दस्तांमध्ये आवश्यक ती शहानिशा न करता नोंदी करण्यात आल्या, असे नमूद केले आहे. काही ठिकाणी मुद्रांक शुल्काबाबत त्रुटी दिसून आल्या असून, संबंधित अधिकारी यांनी योग्य कार्यवाही न करता दुर्लक्ष केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याशिवाय, काही प्रकरणांत आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर न करता नोंदी करण्यात आल्या असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर गंभीर तफावत झाल्याचे दिसले आहे.तरीही भोई यांना पदोन्नती व निवृत्ती प्राप्त झाल्याने त्यांना मंत्रालयात पाठीशी घालण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाबाबत जबाबदार अधिकारी भोई यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.