पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २ मार्च २०२६ जाहीर करण्यात आली आहे. मात्र, २८ फेब्रुवारीला शनिवार-रविवार सुट्टी आल्याने इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळत असल्याची तक्रार पुढे येत आहे.
या प्रक्रियेत सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. कमी वेळेमुळे कागदपत्रांची पूर्तता करताना मोठी धावपळ होत असून अनेक इच्छुक उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तात्काळ दखल घेऊन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी व पात्र उमेदवारांना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्ते सचिन काळभोर यांनीही स्वीकृत नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करत प्रशासनाकडे निवेदन दिले आहे.
मागणी मान्य न झाल्यास महानगरपालिकेच्या दारात उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील सचिन काळभोर यांनी आयुक्तांना दिला.



















































