२२ आरएमसी प्रकल्पांची तपासणी, नियमभंग करणारे १४ प्रकल्प सील
पिपीसी न्यूज नेटवर्क
पिंपरी, दि. २२ एप्रिल २०२६ :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सातत्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम व औद्योगिक आस्थापनांकडून होणाऱ्या धूळकणांच्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १७ ऑक्टोबर २०२५ च्या पत्रान्वये आरएमसी प्रकल्प संचालनासंबंधी मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू आहे.
या अनुषंगाने महापालिकेच्या उपद्रव शोध पथकांमार्फत शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पांवर व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण २२ आरएमसी प्रकल्पांची सखोल पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पर्यावरणीय नियम व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या १४ प्रकल्पांवर तात्काळ कारवाई करत त्यांना सील करण्यात आले. यामध्ये धूळ नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा नसणे, परिसरात पाण्याची फवारणी न करणे, उघड्यावर साहित्य साठवणे, तसेच धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव आदी गंभीर त्रुटी आढळून आल्या.
उर्वरित प्रकल्पांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटींनुसार संबंधितांना कडक इशारा देण्यात आला असून, हवा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली तातडीने बसविणे, पाण्याची नियमित फवारणी करणे, संपूर्ण प्रकल्पाभोवती शेड्स उभारणे, धूळ नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे या बाबी त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना राबविल्या जात असून, औद्योगिक तसेच बांधकाम प्रकल्पांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अशा कारवायांना पुढील काळातही अधिक गती दिली जाणार आहे, असे पर्यावरण विभागातर्फे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार आरएमसी प्रकल्प संचालनासंबंधी महत्त्वाचे नियम
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘ऑरेंज’ वर्गवारीनुसार सर्व परवानग्या घेणे बंधनकारक.
• शाळा, रुग्णालये, न्यायालये यांपासून २०० मीटर व निवासी भागापासून किमान ५० मीटर अंतर राखावे.
• संपूर्ण प्रकल्प बंदिस्त व कच्चा माल, सिलो, कन्वेयर, लोडिंग-अनलोडिंग व मिक्सिंग युनिट आच्छादित ठेवणे बंधनकारक.
• नियमित पाणी फवारणी, धूळ संकलन प्रणाली व हरित पट्टा निर्माण करणे अनिवार्य.
• पक्के अंतर्गत रस्ते, नियमित साफसफाई व सर्व स्थानांतरण बिंदू बंदिस्त ठेवणे आवश्यक.
• टायर धुण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे व जीपीएस प्रणाली अनिवार्य आहे तसेच वाहने स्वच्छ करूनच बाहेर सोडावीत.
• कच्चा माल बंदिस्त ठिकाणी ठेवणे व कन्वेयर बेल्ट झाकलेले असणे आवश्यक.
• वायू प्रदूषण नियंत्रणाच्या पीएम १० व पीएम २.५ मानकांचे पालन करणे बंधनकारक.
• सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर अनिवार्य आहे तसेच ते इतरत्र सोडण्यास मनाई.
• ध्वनी व घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करणे बंधनकारक.
• औद्योगिक क्षेत्राबाहेरील प्रकल्प सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच कार्यान्वित असावेत.
शहरातील वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळविणे ही महापालिकेची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. बांधकाम व औद्योगिक प्रकल्पांनी पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असून, कोणत्याही प्रकारचा नियमभंग सहन केला जाणार नाही. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर सातत्याने कारवाई करून शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
शहरातील आरएमसी प्लांट्स आणि बांधकाम प्रकल्पांनी बांधकाम ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे अनिवार्य आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता तात्काळ कारवाई केली जात आहे. पुढील काळातही अशी तपासणी मोहीम राबवून प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक नियंत्रण ठेवण्यात येईल.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका



















































