पुणे:- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी 1942 साली चले जाव आंदोलनाची हाक दिली आणि त्यानंतर ब्रिटीशांनी त्यांच्यासह अनेकांची धरपकड केली. गांधीजींना त्यावेळी पुण्यातल्या आगा खान पॅलेस इथे स्थानबद्ध करण्यात आले होते . आपल्या प्रेरणादायी स्वातंत्र्यलढ्याच्या या स्मृती आजही प्रत्येकाला रोमांचित करतात. याच ऐतिहासिक आगा खान पॅलेसमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी फोटो प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रम मालिकेचा भाग असलेल्या या उपक्रमाचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते दृकदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन 15 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात पॅनेलच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या नेत्यांचे विचार-कार्य मांडले आहे. यात महात्मा गांधी, सरदार पटेल, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा प्रभूतींचा समावेश आहे.
मोठ्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र मिळाले आहे, त्यामुळेच प्रत्येकाने स्वातंत्र्यलढ्याचा हा प्रवास समजून घेणे आवश्यक आहे, असे जावडेकर यांनी सांगितले. आपला देदीप्यमान स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाच्या तेजस्वी कथा आजच्या पिढीतील सर्वांपर्यंत त्यांच्या मातृभाषेतून पोहोचाव्यात या हेतूनेच देशभरात विविध ठिकाणी ही प्रदर्शने भरवण्यात आली आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले.
उद्घाटनानंतर दिल्ली येथील मिडीया सेंटरमध्ये होत असलेल्या कार्यक्रमातही जावडेकर ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. पुण्यासह देशात आणखी पाच ठिकाणी आयोजित फोटोप्रदर्शनाचे त्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन झाले. मोईरंग (मणिपूर), भुवनेश्वर(ओडिशा), सांबा(जम्मू), पटना(बिहार) आणि बंगळूरू(कर्नाटक) याठिकाणी ही प्रदर्शने भरवण्यात आली आहेत. सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आपल्या मनात एक इतिहासाचा संस्मरणीय धागा इथून घेऊन जावा, असे आवाहन जावडेकर यांनी केले.
या प्रदर्शनाचा हेतू स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि कर्तृत्वाला अभिवादन करणे हा आहे. त्याशिवाय, देशाच्या विविध भागात स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, अनाम वीरांचा संघर्ष जगासमोर आणणे हा ही यामागचा प्रयत्न आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि गोव्याच्या लोकसंपर्क विभागाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी या प्रदर्शनाची माहिती दिली.