*उद्योजगताच्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठीअप्रेन्टिसयोजना प्रभावी- संजय छत्रे*
*रबर स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल (आरएसडीसी) तर्फे अप्रेन्टिस योजनेवरील वेबिनारचे आयोजन.*
*पुणे : दिनांक : ११ मे २०२१* : उत्पादन क्षेत्रातील औद्योगिक कंपन्यांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी अप्रेन्टिस योजना प्रभावी व परिणामकारक ठरत आहे असे मत यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या अप्रेन्टिस विभागाचे संचालक संजय छत्रे यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारच्या रबर स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल (आरएसडीसी) तर्फे अप्रेन्टिस योजनेवरील (हाऊ इंडस्ट्रीज कॅन बिकम बेसिक ट्रेनिंग प्रोव्हायडर अंडर नॅप्स) वेबिनारमध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, अप्रेन्टिस योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्ष औद्योगिक आस्थापनांमधून होत असल्याने अप्रेटिस प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो, विविध यंत्रसामग्री हाताळण्याची संधी मिळाल्याने बहुविध कौशल्य (मल्टीटास्किंग)प्राप्त होते. अप्रेन्टिस योजनेअंतर्गत औद्योगिक आस्थापनेला बेसिक ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणून नोंदणी करता येण्याची तरतूद आहे. तसेच योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या औद्योगिक आस्थापनांच्या आवश्यकतेनुसार अप्रेंटिससाठी टीपीए म्हणून कार्यरत असलेल्या ‘यशस्वी’ संस्थेकडून अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात येतो. हा अभ्यासक्रम तयार करताना अप्रेन्टिसला करावे लागणाऱ्या कामाचे स्वरूप, त्याची शैक्षणिक पात्रता, औद्योगिक आस्थापनेला अपेक्षित असलेला कुशलतेचा स्तर या निकषांचा विचार करण्यात येतो. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग व क्लासरूम ट्रेनिंग देण्यात येते. तसेच वेळोवेळी त्यांचे मूल्यांकन करण्यात येते, ज्यामुळे संबंधित प्रशिक्षणार्थी ज्ञान व कौशल्यात कुठे कमी पडतो त्या उणिवा लक्षात घेऊन प्रशिक्षणात योग्य ते बदल करून प्रक्षिशक्षणार्थी अधिकाधिक कुशल कसा होईल यादृष्टीने प्रयत्न करता येतात. यामुळे अप्रेंटिसचे अंतिम मूल्यांकन करणे अधिक सोपे होते व अप्रेंटिसला मूल्यांकनानंतर केंद्र सरकारचे प्रमाणपत्र प्राप्त होते.तसेच अप्रेन्टिस योजनेचे प्रशिक्षण झाल्यानंतर बऱ्याचदा संबंधित अप्रेन्टिसना ते प्रशिक्षण करत असलेल्या कंपन्यांनीच नोकरीत सामावून घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत अशी माहितीही संजय छत्रे यांनी दिली.
याप्रसंगी बोलताना सुप्रीम कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक मंदार खाकुर्डीकर यांनी आपल्या मनोगतातअप्रेन्टिस योजनेचे महत्व सांगत यामुळे उद्योगक्षेत्राला अनुभवी व कुशल मनुष्यबळ सहजगत्या उपलब्ध होते असे सांगितले. एखादा अनुभव नसलेला व्यक्ती कंपनीत कामावर रुजू करण्याऐवजी अप्रेन्टिस नियुक्त केल्यास त्या प्रशिक्षणार्थ्याची शिकण्याची वृत्ती कायम असल्याने नवनवीन यंत्रसाम्रगी हाताळण्याची क्षमता लवकर विकसित होते, त्यामुळे औद्योगिक आस्थापना देखील अप्रेन्टिस नियुक्त करण्यास प्राधान्य देत आहेत. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात दोन्ही वक्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत अप्रेन्टिस योजेनचे स्वरूप,अंमलबजावणी प्रक्रिया,अप्रेंटिसचे प्रशिक्षण,मूल्यांकन व प्रमाणपत्र याबाबत सविस्तर माहिती दिली. या वेबिनारसाठी समन्वयक म्हणून रबर स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल (आरएसडीसी) च्या प्लेसमेंट अँड इंडस्ट्री कनेक्ट विभागाच्या व्यवस्थापक दीपमाला मूरजानी यांनी काम पाहिले. या वेबिनारमध्ये देशातील विविध औद्योगिक कंपन्यांचे सुमारे शंभरहुन अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक पदाधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.