पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड : निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाण पुलाखाली श्रीकृष्ण मंदिर समोरील रस्ता गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असताना रस्त्यावर खोदलेले खड्डे आजतागायत बुजवण्यात आले नसल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, यापूर्वी एका दुचाकीस्वाराचा खड्ड्यात पडून अपघात झाला होता. त्यानंतरही संबंधित प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अंकुश चौक ते श्रीकृष्ण मंदिर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, त्यामुळे भाविकांना मंदिरात दर्शनासाठी, तसेच शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सेक्टर २२ येथून निगडी प्राधिकरणकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने नागरिक वैतागले आहेत.
या संदर्भात सचिन काळभोर (भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता, पिंपरी-चिंचवड शहर) यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच निगडी ते पिंपरी मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे.
“तात्काळ खड्डे बुजवून रस्ता सुरू करण्यात यावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नागरिकांची मागणी:
रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी व अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.



















































